ICC action against Haris Rauf : 2025 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तीन सामने खेळवले होते. हे तिन्ही सामने वाद विवादामुळे चर्चेत राहिले. दोन्ही देशांच्या बोर्डांनी एकमेकांच्या खेळाडूंविरुद्ध आयसीसीकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. दरम्यान, आता दोन महिन्यांहून अधिक काळानंतर, आयसीसीने अधिकृतपणे खेळाडूंच्या शिक्षेची आणि त्यांना दोषी आढळलेल्या नियमांची घोषणा केली आहे. पाकिस्ताचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला 14 आणि 28 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यांसाठी शिक्षा देण्यात आली आहे. हरिस रौफवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे, तर भारताच्या सूर्यकुमार यादवला सामन्याच्या फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
14, 21 आणि 28 सप्टेंबर रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्यांदरम्यान घडलेल्या घटनांनंतर आयसीसीच्या एलिट पॅनेल ऑफ मॅच रेफ्रीजच्या सदस्यांनी ही सुनावणी घेतली आहे. सूर्यकुमारला आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.21 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आल आहे. जे खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. तर हरिस रौफलादोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
साहिबजादा फरहानला दोषी ठरवण्यात आले
दुबईतील सुपर 4 च्या सामन्यात भारताविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर बंदुक चालवल्याप्रमाणे सेलिब्रेशन केल्याबद्दल साहिबजादा फरहानला दोषी ठरवण्यात आले आहे. त्याला एका डिमेरिट पॉइंटसह अधिकृत इशारा देण्यात आला. सुपर 4 च्या सामन्यात भारताच्या विजयानंतर व्हायरल झालेल्या त्याच्या हावभावाबद्दल अर्शदीप सिंगला कलम 2 च्या कथित उल्लंघनासाठी दोषी ठरवण्यात आले नाही.
नेमकं काय घडलं होतं?
पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहानने भारताविरुद्ध अर्धशतक पूर्ण केल्यावर ‘गन सेलिब्रेशन’ केले होते. एवढेच नव्हे तर हारिस रऊफने विमान पाडल्याचा इशारा केला. मैदानावर सीमारेषेजवळ भारतीय फॅन्स त्याला विराट कोहलीचे नाव घेत चिडवत होते, त्यावेळी त्याने हातवारे करून विमान पाडणे आणि ‘6-0’ असे इशारे केले होते. या दोन्ही खेळाडूंनी जाणीवपूर्वक भारतीय संघ आणि चाहत्यांना उचकवण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत बीसीसीआयने मॅच रिफरी अँडी पायकॉफ्ट यांच्याकडे हारिस रऊफ आणि साहिबजादा फरहान यांच्या वर्तनाबाबत तक्रार दाखल केली होती. भारतीय बोर्डाने या दोघांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली होती. तसेच अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसोबत झालेल्या हारिस रऊफच्या वादावरही आक्षेप नोंदवण्यात आला होता.