Rahul Gandhi On Brazilian Model: लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (AICC) मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधींनी हरियाणातील विधानसभा निवडणुकीवरून (Assembly Elections in Haryana) भाजप (BJP) आणि निवडणूक आयोगावर नवा बॉम्ब टाकला. यावेळी देशाला थक्क करणारी एक बाब राहुल गांधी यांनी सांगितली. एका ब्राझील मॉडेलनं (Brazilian Model) हरियाणात 22 वेळा मतदान केल्याचं राहुल यांनी प्रेझेंटेशनमधून दाखवून दिलं.
मोठ्या स्क्रिनवर प्रेझेंटेशन देताना राहुल गांधी यांनी सांगितलं की, “ब्राझील मॉडेलनं हरियाणात 10 वेळा मतदान केलं. हरियाणा विधानसभा निवडणुकीत आमच्या उमेदवाराने काहीतरी चुकीचं असल्याचं सांगितलं होतं. या मॉडेलनं कधी स्वीटी म्हणून तर कधी सीमा म्हणून मतदान केलंय.” तसेच, राहुल गांधी यांनी दावा केला की, हरियाणात 25 लाख मतं चोरीला गेलीत.
राहुल गांधींनी आणखी एक दावा केलाय. ते म्हणाले की, त्याच महिलेचं नाव बूथवर 223 वेळा आलं. निवडणूक आयोगानं त्या महिलेनं किती वेळा मतदान केलंय याचं उत्तर द्यावं. एका मुलीनं 10 ठिकाणी मतदान केलं. बनावट फोटो असलेले 1,24,177 मतदार होते. मतदार यादीत नऊ ठिकाणी एका महिलेनं मतदान केलं. राहुल गांधी म्हणाले की, यामागील हेतू स्पष्ट होता. भाजपला मदत करणं. ही मतदान चोरी लोकांना दिसली पाहिजे. यासाठी निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजेत. म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आलं.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “भारतातील तरुणांनी, GenZ यांनी हे स्पष्टपणे समजून घ्यावं, अशी माझी इच्छा आहे. कारण हे तुमच्या भविष्याबद्दल आहे. मी निवडणूक आयोगावर, भारतातील लोकशाही प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय, म्हणून मी 100% पुराव्यांसह हे सादर करतोय. आम्हाला खात्री आहे की, काँग्रेसच्या प्रचंड विजयाचं पराभवात रूपांतर करण्यासाठी एक योजना आखण्यात आली होती. कृपया त्यांच्या (मुख्यमंत्री नायब सैनी) चेहऱ्यावरील हास्य आणि हरियाणाचे मुख्यमंत्री ज्या ‘व्यवस्थे’बद्दल बोलत आहेत, त्याकडे लक्ष द्या…”
आमच्याकडे ‘H’ फाईल्स : राहुल गांधी
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की, “आमच्याकडे ‘H’ फाईल्स आहेत, हे संपूर्ण राज्यात मतदान चोरी कशी झाली, याबद्दल आहे. आम्हाला शंका होती की, हे केवळ वैयक्तिक मतदारसंघांमध्येच नाही तर, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर घडलंय. हरियाणामधील आमच्या उमेदवारांकडून आम्हाला असंख्य तक्रारी आल्या की, काहीतरी चूक आहे आणि ते काम करत नाही. त्यांचे सर्व अंदाज उलटे निघालेत…” आम्ही मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात हे अनुभवलं होतं, पण आम्ही हरियाणावर लक्ष केंद्रीत करण्याचा आणि तिथे काय घडलंय, याचा तपशीलवार शोध घेण्याचा निर्णय घेतला.