The GD News

 पार्थ पवारांनी 1800 कोटींच्या जमिनीसाठी फक्त 500 रूपये मुद्रांक शुल्क भरले? राज्य सरकारकडून 21 कोटींचे मुद्रांक शुल्क माफ?

Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे (Ambadas danve) यांनी गंभीर आरोप केलाय. पार्थ पवारांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 1800 कोटींच्या जमिनीच्या व्यवहारात मोठा गैरव्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या व्यवहारात पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त 300 कोटींमध्ये जमीन विकत घेतल्याचा, तसेच केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क (स्टँप ड्युटी) भरल्याचा दावा दानवेंनी केला आहे. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हे डील 300 कोटीचे दाखवून, त्यावरचे 21 कोटी देखील माफ… ही माफी फुकट नव्हती का?, असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलाय. 

अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की,  मेवाभाऊंच्या राज्यात… 1800 कोटींची जमीन, 300 कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे 500 रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे 1 लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे 1800 कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची 300 कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. 

Ambadas Danve on Parth Pawar: एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे शक्य होते?

गंमत तर पुढे आहे.. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल! 

Ambadas Danve on Parth Pawar:  अवघ्या 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ 

दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! 22 एप्रिल 2025 रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या 48 तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे 27 दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या 40 एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये 500! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र, असे म्हणत अंबादास दानवे यांनी पार्थ पवारांवर गंभीर आरोप केलाय. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top