The GD News

उद्धव ठाकरेंचं शेतकऱ्यांना आवाहन, जोपर्यंत कर्जमाफी नाही, तोपर्यंत सरकारला मत देणार नाही असे बोर्ड लावा; भाजपचा पलटवार

मुंबई : राज्यात एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा झाली असताना, दुसरीकडे शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर पोहोचले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारची मदत मिळाली की नाही, शेतकऱ्यांना (Farmer) शासकीय मदत किती मिळाली, याचा आढावाच ते या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेत आहेत. उद्धव ठाकरेंनी आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भेट घेत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, जूनची कर्जमाफी (Loan waiver) आम्हाला मान्य नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मत नाही हे बोर्ड लावा, निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड असा लावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलंय.

धाराशिव येथे शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही शेतकरी आहात ना? नाहीतर सरकारचे लोक म्हणतील मुंबईतून लोक आणली आणि टोप्या घालून बसवली. मला सभा घ्यायची नाहीय, मी तुमच्याशी बोलायला आलोय. मुख्यमंत्री म्हणाले इतिहासतली सगळ्यात मोठी मदत आहे, पण ही इतिहासातील सगळ्यात मोठी थाप आहे. तुमच्या पॅकेजला खेकड्याने भोक पाडली का? पॅकेजचं काय झालं? मदत का मिळाली नाही? अशी टीका उद्धव ठाकरेंनी धाराशिव दौऱ्यातून सरकारवर केली. हे सरकार दगाबाज सरकार आहे, या सरकारशी दगाबाजी केली पाहिजे. निवडणूक आली म्हणून मी आलोय म्हणताय, अरे आपत्ती आलीये ती थोडीच थांबली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

विमा कंपन्याना सांगतो की, शेतकऱ्यांची सगळी रक्कम द्या, नाहीतर हे सगळे तुमच्या ऑफिसवर येतील. फसल योजनेमध्ये तुम्हाला फसवलं आहे, फसलमध्ये फसवलं आहे. कैसन बा? अरे येथे तुझा बा शेतकरी बसलाय ना? लाडकी बहीणमध्ये सगळ्यांना पैसे मिळत होते आता कुटुंबातील दोघांनाच पैसे मिळत आहेत. एक अनर्थ मंत्री, एक गृह कलह मंत्री आणि एक नगरभकास मंत्री हे आपले मंत्री आहेत, अशा शब्दात ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली. अजित पवार म्हणताय तुम्ही हात पाय हलवा, अरे तुम्ही हलवा ना, शेतकरी भीक मागायला सरकाराच्या दारात येत नाही. जूनमध्ये कर्जमुक्ती काय करताय, अरे माणूस आत्ता आजारी आहे. आत्ता द्या, नंतर देऊन काय उपयोग? आत्ता निवडणूक येत आहे, सरकार हिंदू-मुस्लिम करतील, मराठी-अमराठी करतील, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

तोपर्यंतसरकारला मत नाही, असेबोर्डलावा

केंद्राचं पथक आलंय, तुम्ही पाहिलं का? रात्रीचे टॉर्च घेऊन फिरताय. तीन दिवसांत सगळं झाल्यानंतर महिन्यानंतर हे पथक पाहणी काय करणार? केंद्राचा पथक दाखवा आणि 100 रुपये मिळवा असे बोर्ड दाखवा. शेतकरी एकदा उसळला तर तुमचं सिंहासन झळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत कर्जमुक्ती नाही, तोपर्यत सरकारला मतं नाही हे बोर्ड लावा. निश्चय करून टाका आणि सगळीकडे बोर्ड लावा की, जोपर्यंत कर्जमाफी देत नाही तोपर्यंत सरकारला मत देणार नाही, असे आवाहनही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केलं.

प्रवाणदरेकरांचाठाकरेंवरपलटवार

उद्धव ठाकरेंचा मराठवाडा दौरा शेतकऱ्यांसाठी नाही तर राजकारणासाठी आहे, राजकारण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पैसे खात्यात जात आहेत. मात्र, आपल्या काळात फक्त घोषणा झाल्या, थेट काही मिळाले नाही. मुख्यमंत्री विचारा कुठे आहेत, ते शेतकऱ्यांसाठी 24 तास काम करत आहेत. तुमच्यासारखं नौटंकी भावनेवर आमचं राजकारण नाही, शेतकऱ्यांना मदत करण्याचे राजकारण आमचे कृतीतून आहे, असेही दरेकर यांनी म्हटलं. हे बरं झालं उद्धवजी तुम्ही मातोश्रीवरुन किमान बाहेर पडला आणि बांधावर गेलात तरी, शेतकऱ्यांच्या प्रति तुमचे प्रेम पुतण्या मावशीचं आहे, अशा शब्दात प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर टीका केलीय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top