The GD News

उसाला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही, तोडगा काढा, नाहीतर 5 तारखेला उसाचा बुडका घेऊन मुख्यमंत्र्यांचं स्वागत करु, राजू शेट्टींचा इशारा

ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

Raju Shetti : ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कारखानदार जाहीर करत असलेला 3 हजार 400 रुपयांचा दर मान्य नाही. तर उसाला 3 हजार 751 रुपयांचा दर द्यावा. सोमवारपर्यंत जिल्हा प्रशासनाने कारखानदार आणि संघटनांची बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. सोमवारी ही बैठक न झाल्यास बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे उसाचा बुडखा देऊन स्वागत करु असा इशाराच या वेळेस राजू शेट्टी यांनी दिला आहे. 

सात तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि बेमुदत ऊसतोड रोखणार

ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी सहा नोव्हेंबरला बैठक घेण्याचं नियोजन जिल्हा प्रशासन करत आहे.  सहा नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास सात तारखेपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि बेमुदत ऊसतोड रोखेल असा इशारा सुद्धा शेट्टींनी यावेळेस दिला आहे.

3751 रुपयांबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय कारखानदार एकत्रित येवून 3400 ते 3450 पर्यंत पहिली उचल देत आहेत. सदरची उचल आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत केलेल्या 3751 रुपयांबाबत तोडगा नाही झाला तर कार्यकर्त्यांनी भूमिगत होवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचे आदेश स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिले आहे. सांगली, कोल्हापूर व कर्नाटक सीमाभागात ऊस आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राज्य सरकारने साखर कारखानदार व शेतकरी संघटना यांचेसोबत मध्यस्थी करून गळीत हंगाम सुरू होण्यापुर्वी तोडगा काढावी अशी आमची अपेक्षा होती. मात्र राज्य सरकार व कारखानदार या मुद्याकडे दुर्लक्ष करु लागले आहे.  सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. जाहीर केलेली आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी सर्व  शेतकरी संघटना, कारखानदार व प्रशासनाची बैठक घेऊन  मार्ग काढण्याचे  मागणी केली आहे.

उसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी

गतवर्षी साखर कारखान्यांनी साखरेसह उपपदार्थातून चांगले पैसे मिळविले आहेत. यावर्षीसुध्दा साखर , इथेनॅाल , मोलॅसिस , बगॅस या उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे. काटामारी व रिकव्हरी चोरीतून शेतक-यांची लूट केली जात आहे. हंगामाच्या सुरवातीस कारखानदारांनी गुंडाच्या करवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करत आहेत. यामुळे शेतक-यांनी ऊसाला चांगला भाव पाहिजे असल्यास संघटित होवून आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल. प्रशासन व राज्य सरकारने तातडीने तोडगा नाही काढला तर राज्याचे मुख्यमंत्री 5 नोंव्हेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी भुमिगत होवून आंदोलनाची तयारी करावी त्याबरोबरच 7 नोव्हेंबर रोजी निगवे ता. करवीर येथून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top