धावत्या रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
पोलिसांकडून ओळख पटविण्याचे आवाहन
तुमसर:तुमसर रोड ते तुमसर रेल्वे स्टेशनदरम्यान बुधवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. सकाळी सुमारास ७ ते ७.३० वाजताच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली असून रेल्वे ट्रॅकशेजारी भीषण अवस्थेतील मृतदेह पाहून परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. धावत्या गाडीतून पडून हा युवक ठार झाल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्राथमिक तपासानुसार हा युवक वय २५ ते ३० च्या दरम्यानचा असून अंगावर गुलाबी शर्ट व काळ्या रंगाची पँट परिधान केलेली आहे. स्थानिक रेल्वेप्रशासनाच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा स्वरूपावरून हा अपघात असल्याचे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिस स्टेशनचे तपासी अधिकारी पो.उपनिरीक्षक श्रीचंद गंगावणी यांच्या मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला. मृतदेह ओळख पटेपर्यंत तुमसर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.
या युवकाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संबंधितास ओळखणाऱ्यांनी तात्काळ तुमसर पोलिस स्टेशनला किंवा तपासी अधिकारी यांच्याशी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
