The GD News

पुरुष आणि आत्महत्या 

असे म्हटले जाते की,पुरुषप्रधानत्व हे महिलांपेक्षा पुरुषांवर अधिक परिणाम करते. कदाचित याचमुळे महिलांपेक्षा पुरुष जास्त आत्महत्या करत असतील.

जगभरात सरासरी प्रत्येक 43 सेकंदानी आत्महत्येने एक मृत्यू होतो आणि भारतातही हे प्रमाण काही कमी नाही. ज्यामध्ये पुरुष अधिक असुरक्षित आढळत आहेत. द लॅन्सेट या इंग्लंडमधील प्रसिद्ध मेडिकल जर्नलने प्रकाशित केलेल्या पत्रकानुसार, भारतातील विवाहित पुरुषांमधील आत्महत्या ग्रस्त मृत्यूचे प्रमाण हे 24.3% आहे, जे विवाहित महिलांमध्ये 8.4% आहे. याचा अर्थ हे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तिप्पट आहे.

WHO च्या माहितीनुसार, जगभरात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची संख्या ही दरवर्षी जवळपास 8 लाखांच्या घरात पोहोचली आहे.  तर, एनसीआरबीने प्रकाशित केलेल्या शेवटच्या ADSI अहवालानुसार भारतातील एकूण आत्महत्यांच्या तुलनेत एक तृतीयांश आत्महत्या या प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र तसेच तामिळनाडू या राज्यांमधून आहेत. 

तरीही कोणी पुरुषांच्या किंवा विवाहित पुरुषांच्या आत्महत्येवर बोलत नाही. प्रत्येकजण फक्त गृहिणींच्या आत्महत्येविषयीच बोलतो. आपल्या आजूबाजूला, गल्लीमध्ये, गावामध्ये अशा घटना घडत असतात. आपण टीव्हीवर सुद्धा अशा प्रकारच्या बातम्या बघत असतो. 

एखाद्या पुरुषाने आत्महत्या केली तर तो पळपुटा होता किंवा तो नक्कीच कोणत्यातरी प्रकरणात अडकला असणार… या नजरेतून समाज त्याच्याकडे बघत असतो. परंतु, हेच जर एखाद्या महिलेच्या बाबतीत घडले तर समाज जास्त करून पुरुषांना जबाबदार ठरवत असतो. मग त्यामागील कारण पुरुष असो वा नसो. मग काहीसे असे बोलले जाते की तो व्यसनाधीन होता, त्याला त्याच्या जबाबदाऱ्या पेलता आल्या नाहीत किंवा तो मानसिक रोगी होता. 

याउलट जर काही प्रतिक्रिया येत असतील तर असे ऐकायला मिळते की त्याने आर्थिक अडचणींचा जरा जास्त सामना केला असता तर संकट टळले असते. अशा प्रकारचे नाट्यमय सांत्वन करण्याचे काम हा समाज करत असतो. परंतु, खऱ्या अर्थाने समाजातील एक घटक म्हणून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा मानसिक सांत्वन हवे होते तेव्हा हा समाज का समोर येत नाही? 

असे म्हणतात की, त्याग हा जीवनाचा पाया तर मानसिक समाधान हे जीवनाचा कळस असतो. आपल्याला ज्याप्रमाणे पुरुषाने महिलेचा केलेला छळ ऐकायला मिळतो त्याप्रमाणे समाजामध्ये महिलेने पुरुषाचा केलेला छळ अशाही घटना घडत असतात. हेच जर आपण समाजाच्या नजरेतून पाहायला गेलो तर पुरुषाने महिलेचा केलेला शारीरिक किंवा मानसिक छळ याच्याकडे गुन्हा या नजरेतून पाहिले जाते आणि ते पहायलाच हवे. दुर्दैव हे की क्रूरतेची धुरा ही सगळ्याच बाबतीत काळाच्या ओघात कुठेतरी घट्ट होत चालली आहे. 

देशभरात बऱ्याच क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुण-तरुणींच्या आत्महत्येची उदाहरणे समोर येतात. तसेच चढाओढीच्या स्पर्धापरीक्षांमध्ये उतरलेल्या विद्यार्थ्यांना पोस्ट न मिळाल्याने आत्महत्या केल्याच्याही बातम्या ऐकायला मिळतात. एका विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या ही काही पहिली घटना नाही. सरकारच्या अपुऱ्या योजनांना कंटाळून आत्महत्या केलेल्यांची संख्यादेखील बरीच आहे. मग, यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सरकारी यंत्रणांना जबाबदार धरले जावे का असा प्रश्न पडतो.

हेच शेतकर्‍यांच्या बाबतीत पाहायला गेले तर त्याच्या आत्महत्येचे कारण फक्त असे नाही की त्याला कर्जाचा डोंगर पेलता आला नाही. जगाचा पोशिंदा जेव्हा आत्महत्या करतो तेव्हासुद्धा त्याने आपल्या पोरा-बाळांचा विचार केला नाही म्हणून समाज त्याच्याकडे बोट दाखवतो.

गेल्या जूनमध्ये एका मराठी अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी तग धरुन होती.  फिल्मस्टार ‘सुशांतसिंह राजपूत’ च्या आत्महत्येनंतरही बर्‍याच चर्चांना उधाण आले होते. तो मानसिक रोगी असेही म्हटले जात होते, परंतु सर्वांनी आता हे लक्षात घेणे गरजेचे आहे की,चर्चा, संवाद, वाद-प्रतिवाद यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. आत्महत्या हा शेवटचा पर्याय मुळीच नाही. कारण प्रचंड भीतीदायक वातावरणात देखील त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याचे स्वातंत्र्य माणसाला असतेच असते. खरेतर सगळे संपले असे भासवणाऱ्या क्षणांतसुद्धा अर्थ निर्माण करता येतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top