मोबाईलवर (Mobile) येणारे अज्ञात कॉल ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरतात. त्यामुळे, अज्ञात किंवा अनोळखी नंबरपासून सुटका करण्यासाठी मोबाईलधारक फोन न उचलणे किंवा संबंधित नंबर ब्लॉक करणे असे पर्याय निवडतात. अनेकदा अनोळखी नंबर नेमका कोणाचा आहे, त्याचं काम काय असेल, असे अनेक प्रश्न आपणास पडतात. मात्र, आता अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार असून अज्ञाताचं नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. त्यामुळे, तुमच्या मोबाईलवर कॉल आल्यानंतर आता नंबरसमवेत संबंधित व्यक्तीचं नावही झळकणार आहे. कारण, देशात CNAP (CNAP) सेवा सुरू करण्याचे निर्देश दूरसंचार विभागाने टेलिकॉम (Telecom) इंडस्ट्रीजला दिले आहेत.
तुमच्या मोबाईलवर अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास त्या व्यक्तीच्या क्रमांकासह त्या व्यक्तीचं नावही लवकरच झळकणार आहे. कारण, भारतात मोबाईलवर कॉलिंग नेम प्रेझेन्टेशन सर्व्हिस म्हणजे सीएनएपी सेवा सुरु करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पावलं उचलली आहेत. त्यामुळे यापुढं मोबाईलवर संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या क्रमांकासह, त्या व्यक्तीचं खरं नावही तुम्हाला दिसणार आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया म्हणजे ट्रायच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारनं सीएनएपी सेवा सुरु करण्याचे निर्देश मोबाईल कंपन्यांना दिले आहेत. येत्या 7 दिवसांत किमान एका सर्कलमध्ये तरी ही सीएनएपी सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, मोबाईलवर येणारे स्पॅम कॉल्स आणि मोबाईलवर संपर्क साधून होणाऱ्या फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
TRAI म्हणजेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाने फेब्रुवारी 2024 मध्येच या सेवासंदर्भाने आपल्या शिफारसी जारी केल्या होत्या. त्यानुसार, कॉलिंग नंबरसह संबंधित व्यक्तीचं नावही मोबाईलच्या स्क्रीनवर युजर्संना पाहता येईल. ज्या व्यक्तीच्या नावे सीम कार्ड असेल त्या व्यक्तीच्या नाव मोबाईल स्क्रीनवर झळकणार आहे. कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव Customer Application Form (CAF) मध्ये नमूद नावानेच निश्चित होईल. सीम खरेदी करताना ग्राहकाने दिलेले नावच या नंबरसमवेत दिसून येईल.
कंपन्यांना सेवा देणे बंधनकारक
TRAI च्या शिफारसीनुसार, CNAP ला भारतीय टेलिकॉम नेटवर्कमध्ये “सप्लीमेंटरी सर्विस” च्या रुपाने सहभागी केले जाईल. ज्यासाठी Calling Line Identification (CLI) ने परिभाषित करण्यात आलं आहे. त्यामुळे, कॉलरची ओळख मोबाईल क्रमांक आणि नाव दोन्ही असेल. देशातील सर्वच टेलिकॉम कंपन्या जसं की Jio, Airtel, Vi आणि BSNL कंपन्यांकडून आपल्या ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, सध्या ट्रू कॉलर या अॅपद्वारे मोबाईल धारकांना ही सेवा मिळत असून मोबाईल नंबरसह संबंधित व्यक्तीचं नावही पाहायला मिळत आहे.